दुसऱ्याचा विचार
सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं, आणि ओवलेला दोरा संपला, तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं. पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं, दुसऱ्यानं तिसऱ्या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच, पण गैरसोयही टाळता यायची. सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही. आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही. पाण्याची बाटली ...