लेखांक तिसरा : पळसाला पाने तीनच !

 आपल्या पूर्वजांनी किंवा आधीच्या पिढीने फार विचारपूर्वक काही गोष्टी म्हणींच्या रुपात आपल्याला वारसा म्हणून दिलेल्या आहेत. कालबाहय म्हणून त्या टाकून न देता कालानुरुप योग्य ते बदल करुन त्याचे सुधारित स्वरुप निश्चितच आपल्याला जीवनात आनंद निर्माण करु शकेल. पैशांची समस्या नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात 'अर्थ' समस्या भेडसावत असतेच असते. व्यक्तिंनुसार तिची तीव्रता बदलेल पण समस्या ही असणारच ! पळसाला पाने तीनच ! (मोठी असतील छोटी असतील पण पाने तीनच). 



थोडक्यात धनसंपत्तीबद्दल म्हणायचं झालं तर “थोडा है थोडे की जरुरत है।” असं प्रत्येकाला वाटतंच वाटतं. किती मिळालं तरी समाधान होत नाही उलट हवंहवंसं वाटणारं हे जगातलं एकमेव 'अर्थ' शास्त्र ! या 'अर्था' ने जीवनाला कधी 'अर्थ' मिळतो तर कधी 'अनर्थ'ही होतो. आपल्याला या 'सुंदर' जगण्याला अर्थपूर्ण करायचं आहे . शून्यातून जग निर्माण करणाऱ्यांनी किंवा इतिहास घडविणाऱ्यांच्या आयुष्याकडे नजर टाकली तर अनेक समस्यांना भिडत त्यांनी आपला 'नवा' मार्ग चोखाळला की ज्याने त्यांनाही अचंबित व्हायला होते. 

प्रवाहाविरुध्द पोहण्याचे धाडस त्यांनी दाखवले म्हणून ते यशस्वी झाले. समाजाचे आदर्श ठरले. अशांना प्रेरणास्थानी ठेवून आपणही आपल्या आयुष्यात १० फुटांची फुलबाग फुलवू शकतो ना ! १००० मैलाच्या रखरखीत वाळवंटापेक्षा ते निश्चितच बरे ! नाही का ? 

अहो, सर्व सोंगं करता येतात पैशाची सोंगं करता येत नाहीत प्रापंचिकाचा हा 'रोकडा अनुभव' आहे. म्हणून आपण पुढं जायचंच नाही का ? काय नाही त्यापेक्षा काय आहे ? हे पाहायला आपण शिकू. पाडगावकरांच्या 'पेला अर्धा भरला आहे....' अशा सकारात्मक वृत्तीच्या लोकांनाही उत्तरार्धात 'घेता किती घेशील दो करांनी' असा अनुभव येतो. 



थोडक्यात, कठोर निश्चय, चिकाटी, जिद्द, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशस्वी मार्गाकडे नेतो. तुम्ही कोणीही असा योग्य नियोजनाने, अथक परिश्रमाने तुमच्या आर्थिक परिस्थितीत तुम्ही आश्चर्यकारक बदल घडवू शकता. आपण गरिबीत जन्माला आलो तरी पुढील आयुष्य आपण श्रीमंतीचे उपभोगू शकतो, गरज आहे तुमच्या योग्य प्रयत्नांची कारण गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. 

क्रमश: