उन्हाळी शिबीरं मुलांसाठी किती उपयोगी ?

 शाळा आणि विविध क्लासेस यात वर्षभर व्यग्र असणाऱ्या मुलांना एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टया म्हटले की नातेवाईकांच्या गावाला जायचे वेध लागायचे. आपल्या पालकांसमवेत, कुटुंबियांसमवेत मजा-मस्ती करण्याकरिता या सुट्टयांचा क्षण न् क्षण वेचला जायचा. पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे या काळात मुलांचा पालकांशी व घरातील वडील मंडळींशी, बहिण-भावडांशी जास्तीत जास्त संवाद साधला जायचा पण आता परिस्थिती बदलली आहे. आजकाल घरात मुल एकच त्यात आईवडिल दोघेही नोकरी करणारे ! त्यामुळे “या सुटट्यांमध्ये मुलांचा शाळेचा वेळ कसा भरुन काढायचा !"





हा मुख्य प्रश्न पालकांसमोर असतो. मुलांच्या या सुट्टीतही पालक त्यांच्या दैनंदिनीत इतके व्यग्र असतात की मुलांना द्यायला त्यांच्याकडे वेळच नसतो आणि म्हणूनच आज या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात विविध उन्हाळी शिबिरांना पालकांकडून वा मुलांकडूनही प्राधान्याने पसंती दिली जाते आणि मग “मागणी तसा पुरवठा" या तत्वावर अशा शिबीरांना या सुट्टयांमधे पेव फुटतं.


मुलांनी घरी राहून तासन् तास इंटरनेटवर खेळत बसण्यापेक्षा वा टिव्हीवर कार्टन्स् पहात बसण्यापेक्षा काही तरी नविन शिकलं पाहिजे म्हणून अशा अल्पकालीन उन्हाळी शिबिरांना मुलांना पाठविलं जातं. त्यामुळे हल्ली या सुट्टीच्या हंगामात अशा शिबिरांचं अमाप पीक वाढलेलं दिसून येतं. पण अशा शिबीरात पाठवतांना पालकांनी जागृत असणे आवश्यक आहे. आपल्या मुलांच्या आवडी-निवडी, त्यांचा कल पाहूनच शिबीरांची निवड पालकांनी केली पाहिजे. मुलांच्या सुट्टीचा उपयोग मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व्हायला हवा. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून कोणत्याही कलेचं शास्त्रशुध्द शिक्षण मिळेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अवास्तव फी देऊन सेलिब्रिटींच्या नावाखाली विनाकारण पैसे उकळणाऱ्या शिबीरांपासून पालकांनी सावध रहायला पाहिजे.




उगाचच आकर्षक जाहिरातींना बळी पडून दिशाभूल करणाऱ्या शिबीरांमध्ये अवास्तव फी भरण्यापेक्षा आपल्या मुलांचा कल जाणून घेऊन कोणत्या शिबिरात घालावं हे पालकांनी ठरवायला पाहिजे. मुलांना त्यांचे छंद व आवडी-निवडी जोपासता येतील अशी शिबीरं हवीत. “केवळ हौस किंवा स्वत:कडच्या कलागुणांनी कलात्मक पिढी घडवावी” या उद्देशाने निघालेली ही उन्हाळी शिबीरं व्यवसाय होऊ नये, सिझनल बिझिनेस वा झटपट पैसे कमविण्याच्या मानसिकतेतून अशी शिबीरं आखली जाऊ नयेत तर अशी शिबीरं ही मुलांना शिक्षणाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातही पुढे जाण्याकरिता एक संधी ठरावी व याद्वारे नवीन टॅलेंट निर्माण करता यावं अशी असावीत. केवळ नृत्य, गाणं, अभिनय अशा वलयांकित छंदांच्या शिबीरांनाच प्राधान्य देण्यापेक्षा मुलांच्या शारीरिक, बौध्दिक व कलात्मक या तीन्ही विकासांना चालना देणासाठी प्रयत्नरत असले पाहिजे.


अशी शिबीरं माफक दरात शाळा-शाळांमधून घेण्यात आली तर अवास्तव फी भरुन मुलांना बाहेरच्या वर्गांना पाठविण्यापेक्षा, अशा शिबीरांमध्ये मुलांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास जास्त चांगल्यारितीने साधला जाईल, असे मला वाटते.



संजीव पेंढरकर


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !