लेखांक अकरावा : “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना”
एका हिंदी गाण्याची ओळ मला आठवली “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना” प्रेयसीचा आशावाद छान आहे पण त्यापलीकडे जाऊन मला वाटतं की अशा कल्पनेत स्वप्नरंजनात गुंतुन राहण्यापेक्षा “रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा" हे जास्त समर्पक ठरावे. बदल अपरिहार्य आहे म्हणून सर्व प्रसंगातून जाऊन 'मी' जरा वेगळा ठरेन, मी लवचिक होईन.
जीवशास्त्रात 'अमिबा' जसा आकार बदलतो तसं आपण 'मोल्ड' व्हायचं. सरडयासारखं रंग बदलणं मला अपेक्षित नाही . आमच्या विको उद्योगसमूहाला ६५ वर्ष झालीत . आजोबांपासून आम्ही आयुर्वेदिक औषधांचाच पाठपुरावा केला. उत्पादनांची गुणवत्ता तशीच ठेवली. ग्राहकवर्गाच्या गरजांनुसार फेरबदल केले पण निष्ठा, सचोटी सोडली नाही. म्हणूनच आजवरच्या प्रवासात लक्ष्मी सरस्वती' सोबत राहिल्या. घामाचा एक सुगंध असतो. मी १९८६ पासून संचालकपदी आलो पण आमची परिस्थिती 'आगे दुकान पिछे मकान' अशा स्वरुपाची होती.
फॅक्टरी पण तिथेच घर पण तिथेच त्यामुळे कष्टाची सवय होती. सर्वच काम करायचे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की 'घामाचा वास' माझ्या नाकात डिओप्रमाणे भरुन राहिला. घरातच इतक्या विषयांचं 'बाळकडू' मिळालं की पैशाची, माणसांची खरी किंमत (Real Value) मला समजली. मी लहानपणीच प्रौढ झालो. लक्ष्मीच्या सहवासात राहून, तारुण्यात वा नंतरही मी भरकटलो नाही याचे कारण बालवयातील सुसंस्कारांवर आहेत . मला साधेपणा आवडतो . आयुष्यातले चढउतार मी समुद्रकिनाऱ्यावर बसून लाटा पाहाव्यात तशा पाहतो. वयाचं अर्धशतक पार केल्यानंतर मी जे अनुभवलं ते प्रामाणिकपणे सर्वांना सांगतो. मला शांत झोप लागते आणि चेहरा हा मनाचा आरसा असतो तसा माझा चेहरा माझ्या मनाप्रमाणे सरळ, निष्कपट, अबोध बालकासारखाच आहे.
लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण' या म्हणीप्रमाणे मी वागत नाही जे करतो ते सांगतो. आज मी तुमच्या समोर येतो ते एका कुटुंबाचा कर्ता म्हणूनच ! माझ्या घराविषयीची कर्तव्ये, निष्ठा मी माझ्या उद्योगाविषयी त्याअंतर्गत कुटुंबाविषयी ठेवतो . चतुर्थ श्रेणी वर्गातील कामगाराची समस्या ही माझ्या घरातील असल्याप्रमाणे पाहतो. अर्थ संदर्भात जनजागृती व्हावी तशी अजून झाली नाही. पैसे मिळवले जातात त्यांचं व्यवस्थित नियोजन नसल्यानं ते कापरासारखं उडून जातात. आपलं दुर्दैव नेमकं हेच की योग्य मार्गदर्शक योग्यवेळी मिळत नाही...
क्रमशः