1 लक्ष्मीचे पूजन आणि संवर्धन
काडी काडी जमवून पक्षी घरटं बांधतात आणि आपला काळ सुखाने घालवतात. आपण तर मनुष्यप्राणी विकसित मेंदू लाभलेला निसर्गाचं वरदानच जणू ! त्यालाही एक सुंदर घर असतं आणि तद्नुषंगानं 'घराची समीकरणं' सोडवण्यात प्रत्येकाचंच आयुष्य व्यतित होतं .लक्ष्मी, पैसा अर्थात 'अर्थ' याला जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. कसोटी पाहणारा, गोंधळवून टाकणारा हा पैसा असला तरी समस्या आणि नसला तर त्याहून अधिक समस्या !
मेळविती तितुके भक्षिती। ते कठिण काळी मरोन जाती।। असे श्री समर्थांनी दासबोधात म्हटलेच आहे. थोडक्यात जे काही प्राप्त कराल त्यातील अल्पस्वल्प भविष्याच्या दृष्टीने साठवून ठेवावे लागते. पावसाळयाच्या तोंडावर मुंगीसारख्या यःकश्चित प्राणीही अन्नधान्याचा साठा करतो. आपण तर काय बुध्दीचे वरदान मिळालेले निसर्गातले सर्वश्रेष्ठ !
आपण किती जगणार ? म्हणजे आर्युमर्यादा किती ? हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याच्या व्याधींसह त्याची काळजी घ्यावी लागते आणि या सर्वांसाठी 'पैसा' हवाच. हल्ली पावलोपावली पैसा मोजावा लागतो.
किमान प्रत्येक मध्यमवयीन माणसाने आपला 'नटसम्राट' होऊ नये म्हणून आपली व आपल्या पत्नीची भविष्यकालीन आर्थिक तरतूद करुन ठेवायला हवीच. अहो, पैसा आला की रक्ताची म्हणवणारी नातीही उलटतात. ही जगरहाटी आहे. आपण भलेबुरे सर्व जाणून असावे. कोणत्याही भ्रमात राहू नये. कारण समाजात जे घडतं ते डोळसपणे पाहिलं तर त्याचं वारं आपल्याही घरात वाहू लागू शकतं.