'सबसे बड़ा रुपय्या' म्हणणाऱ्या या युगात आपल्याला रहायचे आहे. सबंध / संपूर्ण आयुष्य पैशाभोवती फिरु लागल्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. पण लक्षात ठेवा सचोटी, श्रमाने मिळवलेले धन कायम टिकते, त्यात वृध्दी होते. लक्ष्मी चंचल असते म्हणून तिचा कायमचा वास राहण्यसाठी प्रत्येकाने तिचा आदर करायला शिकलं पाहिजे.
जोडोनि धन उत्तम वेव्हारे। उदासपणे खर्च करी।। असे तुकोबा म्हणतात, त्यामागे मर्म हेच आहे . व्यवस्थापनशास्त्राचा कोणताही अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या अडाणी व्यक्तीदेखील आपलं गृहखातं व्यवस्थित सांभाळतात. काटकसरी वृत्तीने पैसा सांभाळला तर आपोआप धनसंचय होत असतो.
आर्थिक दृष्टीकोनातून समाजातील वर्ग विचार केला तर कनिष्ठ-मध्य-उच्च वर्गांचा समावेश होत असतो. या सर्वांकडे कमी अधिक प्रमाणात पैसा असतो. आपला आर्थिक स्तर उंच असावा असे प्रत्येकाला वाटते आणि त्यात गैर काही नाही. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन योग्य असेल तर काही काळात आपण आपले ईप्सित ध्येय गाठू शकतो.
आपण कोणत्या वर्गात मोडतो ? म्हणजेच आपण (पॅक्टीकल) वास्तव परिस्थिती स्विकारली पाहिजे. त्यात परिवर्तन आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न करता येतात. Low aim is crime असं महात्मा गांधी म्हणायचे. आपली स्वप्नं भव्य असायलाच हवीत. पण वास्तव नाकारुन चालत नाही. १०० जणांत लॉटरीचे तिकीट काढून एखादाच भाग्यवान होऊ शकतो. बाकी ९९ लोकांना प्रयत्न करावे लागतात.
या ९९ चे प्रयत्न वेगळे असले तरी कमी अधिक प्रमाणात त्यांना यश मिळतेच मिळते.
सर्वप्रथम उत्तम पेपरवर्क करावं यात आपण पुढे राहतो (शहरी-ग्रामीण) उत्पन्नाचा स्त्रोत (व्यवसाय/नोकरी) कुटुंबात मिळवती माणसे किती ? एकूण माणसे किती ? मासिक प्राप्ती आणि खर्च यांचा ताळमेळ जमतो का ? आकस्तिक खर्चाची तरतूद किती असते ? कर्ज किती व किती कालावधीचे आहे ? असे अनेक प्रश्न लिहून काढावेत. बहुतांश जमा कमी व खर्च जास्त असेल पण त्या समस्येतून मार्ग काढावाच लागतो. किंबहुना प्रत्येक समस्या ही एक उत्तर घेऊन जन्माला येते. जेवढया समस्या जास्त तेवढया प्रमाणात मेंदूला चालना मिळते आणि मनुष्य मार्ग काढतो.