लेखांक नववा : आता तुला साध्या सरकीच्या बियांचा त्रास होतोय

मला स्वत:ला प्रवासाची. वाचनाची, लोकांशी संवाद साधण्याची अत्यंत आवड आहे घराविषयी मला ममत्व असते. तरी 'घरा'बाहेर काय चाललंय, हे जाणून घ्यायला मी अत्यंत उत्सुक असतो. माझ्या घरटयाबाहेर आज होणारं वादळ उद्या माझ्या दरवाज्यावर 'दत्त' म्हणून उभं ठाकणारच आहे . बाहय बदलांकडे मी अलिप्तपणे पाहतो आणि अत्यंत सकरात्मकतेने स्वीकारतो. माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात मी चढ-उतार पाहिले, टक्के टोणपे खाल्ले आणि या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडलो. प्रत्येकाला या प्रक्रियेतून जावेच लागते. आपल्या आयुष्याचे ५ किंवा १० वर्षांचे टप्पे केले आणि सिंहावलोकन केले तर आपलं 'मूल्यांकन' आपणच करु शकतो. 



मध्यंतरी वाचनात आलेली शाहू महाराजांच्या बाबतीतली एक कथा आठवते. शाहू महाराज एकदा उन्हाळयात भर दुपारी फिरायला बाहेर पडले. त्यांची घोडागाडी माळावर पोहोचली. तेथे एक धनगर रखरखत्या उन्हातही उशाखाली धोंडा घेऊन निवांत झोपला होतो. महाराजांना त्याची दया आली. त्यांनी त्याला उठवलं. आपल्या घोडागाडीत घेतलं. राजवाडयावर आणलं. पाहुणचारासाठी ८ दिवस थांबण्याविषयी सांगितलं. त्याला सजवलेली छान खोली दिली. जेवायला सुग्रास जेवण दिलं झोपायला मऊ मऊ गादी दिली. धनगर आरामात पाहुणचार झोडत होता. मऊ मऊ गादीवर लोळत होता. असे सहा दिवस संपले. सहाव्या रात्री शाहू महाराजांनी गादीत सरकीच्या ४-५ बिया ठेवल्या. धनगर रात्री झोपला आणि दुसऱ्याच क्षणी ओरडत शाहू महाराजांकडे आला, म्हणाला - 

“महाराज, मला सरकीच्या बिया टोचत आहेत. कुणी ठेवल्या त्या ? आता मला झोप कशी लागणार ? बिया ठेवणाऱ्याला शिक्षा करा महाराज !" 

महाराज खळखळून हसले . धनगराच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, “बाबा रे ! तू, माळरानावर जंगली कुसळात झोपत होतास उशाखाली धोंडा घेऊन झोपत होतास. आता तुला साध्या सरकीच्या बियांचा त्रास होतोय...असा अचानक बिघडवू नकोस तू स्वत:ला !” 



या कथेवरुन हसू येतं. आपलंही असं होऊ शकतं. अंतर्मुख होऊन विचार केला तर केवळ पैशाबाबतच नव्हे तर अनेक ठिकाणी आपल्यातील 'असा' बदल स्वत:ला पर्यायाने इतरांना त्रासदायक ठरु शकतो. 

क्रमश: 


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !