लेखांक दहावा : जैसा देश वैसा भेस

गीतेमध्ये भगवंताने 'स्थितप्रज्ञ' म्हणून एक संज्ञा योजिली आहे. कोणत्याही प्रसंगात ज्याचे चित्त समतोल राहते असा पुरुष अथवा स्त्री स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावी. यासाठी फार मोठी साधना लागते. 

लक्ष्मीचा सहवास अत्यंत रम्य वाटतो. तिचा वियोग भल्याभल्यांना गुडघे टेकायला लावतो ही खरी 'स्वत्व परीक्षा' असते. गरीबी काय असते ? दारिद्रय म्हणजे काय ? हे अनुभवल्याशिवाय कळत नाही कारण परदुःख शीतल असते. 

'दारिद्रय मरण यातुनि मरण बरे बा दरिद्रता खोटी मरणात दु:ख थोडे दारिद्रयात व्यथा असे मोठी।' 



या काव्यपंक्तीत अखिल जगताचे दु:ख सामावलले आहे. कडक उन्हानंतर सावली जितकी सुखप्रद वाटते तितकंच सावली नंतरचं ऊन तितकंच तापदायक नकोसं वाटतं ही असळयता कोणालाच नको असते. पण कालचक्रात आपण सापडतोच सापडतो. मला सांगा दु:ख, त्रास, अपमान कोणाला हवे आहेत ? एक कुंती सोडली तर सर्वांनीच भगवंताकडे सुखाची मागणी केलीय. कलीयुगात सर्व पैशाभोवती केंद्रित झाल्याने क्षणभंगुर सुख हवेहवेसे वाटते. 

'जैसा देश वैसा भेस' असे मानणारा मी आहे. 

एकदा आपल्या स्वानुभवावरुन आणि इतरांच्या अनुभवावरुन जगरहाटी समजली की आपणही कालानुरुप सुसंगत वर्तन ठेवायचे हे माझे तत्व ! पैसा मिळविताना साधनशुचिता बाळगली तर 'पैसा वा अर्थप्राप्ती' दुय्यम दर्जाची नाही. ऐहिक सुखात ही गोष्ट महत्वाची आहे. तिचे संवर्धन करताना मात्र विचारपूर्वकच पावलं उचलली पाहिजेत. यासाठी मी स्त्रीकडे अत्यंत आदराने पाहतो. पत्नी ही पुरुषची उत्तम सल्लागार होऊ शकते. संसार शकटाचं एक चाक अर्थप्राप्तीसाठी धावत असतं तरी त्याच गतीने त्याचं नियाजन करण्याचं तंत्र दुसऱ्या चाकाकडे असते. तेथे आपण म्हणू शकतो . "Made for Each Other !" आतापर्यंतच्या विवेचनात मी घर, स्त्री, अर्थप्राप्ती यावरच भर दिला कारण कुणासाठीही प्राधान्यक्रमात अन्न, वस्त्र, निवारा असतो आणि असतो आणि आपल्या माणसांच्या उबेत राहायला कुणाला आवडणार नाही ? 

तजेलदार रंगीत सुगंधी फुले आहेत पण त्याचा हार करण्यासाठी साध्या सुताची गरज असते. हा 'रज्जू' जेवढा वळकट तितकाच हारही टिकणार ! हे नाकारुन चालणार नाही. वास्तवात जे दिसलं ते आपण स्वीकारायलाच हवं. तुमच्या वर्तमानाची, भविष्याची जबाबदारी तुमची स्वत:ची असते. हे भान एकदा आलं की टिकेसाठी आपण मुलांकडे, नात्यांकडे, मित्रपरिवाराकडे बोट दाखवणार नाही. 

क्रमश: 


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !