लेखांक पाचवा : 'चूल आणि मूल'

पूर्वीच्या बायका म्हणत 'नवऱ्याने भाकरीचे पाठ मिळवले तर बाईने मीठ मिळवावे'. किती उदात्त विचारसरणी होती! 'चूल आणि मूल' इतपतच स्त्रिया काही करु शकत होत्या. शिक्षणाचा गंध नाही. आजच्यासारखी परिस्थिती खचितच तेव्हा नव्हती, तरीदेखील प्रपंचासाठी काही करण्याची त्यांची उर्मी फार काही सांगून जाते. 

मी स्त्रीला आदिशक्तीच्या रुपात मानतो, पाहतो. मला स्त्रियांविषयी अत्यंत आदर आहे. स्त्रियांच्या, कष्टामुळे सहनशक्तीमुळे खंबीरपणाने किती आधार मिळतोहे मी स्वत: अनुभवलेले आहे. पुरुषाने कमवायचे आणि स्त्रीने त्याचे जतन करायचे यापुढे पाऊल टाकून स्त्रीनेही पुरुषाच्या बरोबरीने कमवायचे हा आजच्या काळातला समाजमान्य विचार ! याबद्दल दुमत नाही. स्त्रीच्या कर्तृत्वाला मर्यादा नाहीत म्हणूनच आर्थिक बाबतीतले तिचे स्वातंत्र्य तिच्यासाठी, तिच्या घरासाठी आणि सबंध समाजासाठी विशेष महत्वाचे ठरते. 



कष्टकरी स्त्री असो वा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमधील उच्चशिक्षित उच्च पदस्थ स्त्री असो, दोघीही आर्थिक बाबतीतले नियाजन अतिशय काटेकोरपणे करतात-पाळतात. 

मधमाश्यांच्या पोळयात एक 'राणी माशी' असते आणि इतर कामकरी माश्या विलक्षण एकजुटीने कार्यनियोजन करतात. संघटन कौशल्य, कार्यकुशलता आणि इतक्या विपुल प्रमाणात स्त्रियांनी एकजुटीने काम करण्याचे हे एकमेव उदाहरण ठरावे. आर्थिक दृष्टीकोनातून विचार करता अनेक स्त्रिया एकत्र येऊन 'स्व'चा विकास करुन इतर स्त्रियांच्या आर्थिक उन्तीलाही हातभार लावू शकतात. आपल्याला ज्या विषयात रुची आहे, आवड आहे, कौशल्य आहे अशी गोष्ट हुडकून समानधर्मी स्त्रियांनी एकत्र येऊन उद्योग सुरु केला तर त्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही. केवळ बँक, कॉर्पोरेट ऑफिसेस, पोस्ट अशी मोठी पोस्ट असेलेलीच पैसे मिळवेल असे नाही तर छोटया छोटया वाटणाऱ्या गोष्टींमधूनही प्रचंड फायदा होऊ शकतो. 

शिक्षण नसतानाही स्त्रियांनी कल्पकता दाखवून कष्ट करुन अर्थप्राप्ती केली होती. घरकाम, पापड, लारेणची, शिवणकाम, कलाकुसर विचार करावा तितका थोडा असे पर्याय समोर उपलब्ध आहेत. शिवाय कौशल्यप्राप्तीसाठी सरकारी कोर्सेसही आहेत. गरज आहजे स्त्रीने आर्थिक स्वावलंबनासाठी एक पाऊली पुढे टाकण्याची... 'ज्याने चोच दिली त्याने दाण्याची व्यवस्था केलीय' आ तो दाणा शोधण्यासाठीचे कौशल्यही त्याने प्रत्येकात दिलंय ही दैवी देणगी शोधायची आणि त्याद्वारे लक्ष्मीला आपलंसं करायचं ! 

क्रमशः