लेखांक सातवा : आवश्यकता आहे ती तुमच्या सजगतेची !

एक स्त्री शिक्षित झाली की पूर्ण कुटुंब शिक्षित होते, असे महात्मा फुले म्हणायचे. पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर जाऊन स्त्रीने आर्थिक बाबींचा विचार करायला हवा. कारण स्त्री ही घराचा आधारस्तंभ असते महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिचे मत आवश्यक आहे. मुलांवर संस्कारांची जबाबदारी तिची असते. निसर्गानेही स्त्रीलाच काही गुण बहाल करुन संगोपनाची जबाबदारी तिच्यावर टाकली आहे . वेदकाळात स्त्रिया सक्षम होत्या. त्या स्वउन्नत्तीकरिता धडपड करायच्या, त्याला समाजमान्यता होती. 



देशाचा मधला काळ सामाजिक परिस्थितीने गढूळ झाला आणि सर्वप्रथम बंधने आली ती स्त्रियांवर ! परंतु आता तिला 'या' स्वातंत्र्यासाठी झगडावे लागत नाही. प्रत्येक देश, काल, परिस्थिती भिन्न असते आणि त्यानुसार प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. अगदी रामानेही वनवास भोगला तिथे आपण कोण ? 

आपल्याला आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हायचे आहे. देशाची परिस्थिती पाहता काहीतरी 'जादू' होईल आणि सर्व आलबेल होईल या भ्रमात कोणीही राहू नये. 

आपण आपला विकास करताना आपोआप देशाच्या विकासास हातभार लावू शकतो. हा 'रामसेतू' आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला की अशक्यप्राय गोष्टीही सहज शक्य होतील. जपान सारख्या देशावर दुसऱ्या महायुध्दात किती दारुण परिस्थिती आली होती. लोकांनीच प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. 'फिनिक्स' पक्ष्यासारखी झेप जपानसारखे छोटे राष्ट्र घेऊ शकते तर आपण तुलनेने कितीतरी मोठे आहोत ! 

आपल्याकडे नैसर्गिक साधनसामुग्री आहे, मनुष्यबळ आहे. देशात छोटे मोठे उद्योग आहेत. शेअर्समध्ये करोडो रुपये मिळतील आणि एका रात्रीत आपण करोडपती होऊ म्हणून सबंध मिळकत तेथे ओतायची आणि कपाळाला हात लावून बसायचे हे सुज्ञाचे वागणे नव्हे ! 

उद्योजकांच्या भागभांडवलातील एक भाग आपण जरुर व्हावे कारण देशाच्या विकासाला हातभार लावणार असतो, यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. उगाच अंधारात उडी घेऊ नये. आपल्याजवळील डझनभर अंडी एकाच ट्रेमध्ये ठेवू नका. ती वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठेवा म्हणजे, एक दोन फुटल्याने तुमचे फारसे नुकसान होणार नाही. यासाठी आवश्यकता आहे ती तुमच्या सजगतेची ! 


क्रमश: