लेखांक तेरावा : 'छडी लागे छमछम'
घराचं अंदाजपत्रक बनवताना, हातातोंडाशी आलेला घास जाताना पाहून मला सापशिडीच्या त्या खेळाची सदैव आठवण येते. सरळ मार्गाने जाताना इतके अडथळे, इतर खेळगडी शिडयांच्या सहाय्याने झपाझप वर जात असतात. ते आणखी डिप्रेशन देणारं... अशावेळी एखादा कर्मधर्म संयोगानं सुटला तर आपण हळहळतो. भर गर्दीत आपल्याबरोबरीचा ट्रेनमध्ये चढतो आणि पुढे जातो, आपण किती सुटल्या याची गणितं मांडत बसतो. या सर्वांतून सगळेजण जात असतात. आपल्यापेक्षा दुसरा सुखी असं प्रत्येकाला वाटतं. मनुष्यप्रवृत्ती आहे ही ! मध्यंतरी TV वर 'सोच बदलो' असं सांगणारी एक जाहिरात यायची. खरंच self talk बदलला तर किती सकारात्मक बदल घडून येतील. त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वाबर, कुटुंबावर नातेसंबंधावर किती सुंदर परिणाम होईल. पूर्वी टीव्हीवर म्हणजे दूरदर्शनवर 'संस्कार' नावाची एक साप्ताहिक मालिका होती. त्याचे श्रीधर फडके यांच्या आवाजातले संस्कारावरचे गाणे आजही मला ताल धरायला लावते. मुंबईतल्या एका 'कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नाही' असे वातावरण असलेल्या शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून मोहन जोशी येतात. 'छडी लागे छमछम' असा ठाम विश...