लेखांक बारावा : “गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा”
“गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा”. . . जुन्या काळातील हे गाणं ऐकून कातरवेळी अस्वस्थ व्हायला होतं. जीवनात वेळेला फार महत्व आहे, म्हणून इंग्रजीत 'Time is money' असं म्हटलं जातं. लोकसंख्येच्या भूभागाच्या दृष्टीने आपण अग्रेसर आहोत. नैसर्गिक विविधता आहे. लोकांमध्येही वैविध्य आहे. जगात अशी रंगांची सरमिसळ असलेला तरीही संस्कृती टिकवून ठेवणारा दुसरा देश नाही. परंतु वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की अजूनही म्हणावा तितका विकास, समृध्दी दिसत नाही. पूर्वी म्हणे 'सोन्याचा धूर' निघायचा तो काळ वेगळा होता. वास्तवात आपल्या सगळयांभोवती धूर आणि धुकं भारुन
राहिलंय....
बौध्दयांक चांगला आहे. कर्तृत्ववान माणसं आहेत. तरीदेखील दारिद्रयरेषेखालील जनता पाहिली की मन सैरभैर होतं. कोकणात पाऊस झोडपून काढतो, नद्या तुडुंब वाहतात, नियोजनाअभावी पाणी समुद्राला मिळते आणि कोकणचा कॅलिफोर्निया' होण्याचं स्वप्न 'माकडाच्या घरा' सारखं अधुरं राहतं.
आर्थिक नियोजन करताना फार बारकाईने विचार करावा लागतो. कोणत्याही देशाच्या भौतिक गरजा अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण त्यानंतर अध्यात्मिक विकासाकडे वाटचाल व्हायला हवी.
इथे शिताची, सुताची, छताची वानवा आढळते. उपाशी पोटी काय परमार्थ साधणार ? आपण भ्रामक समजुतीत रहायचं नाही चांगलं होईल' हा आशावाद जरुर असावा पण त्याबरोबर नकारात्मक, प्रतिकूल परिस्थिती आली तरी तग धरता आली पाहिजे. आपल्या पानात षड्रसयुक्त अन्न असते. एकाच चवीचे सर्व पदार्थ शरीराला हानिकारक ठरतील. तसंच आयुष्यात 'आनंदी आनंद गडे' सुरुवातीपासून राहिला तर मजा नाही. थरारक गोष्टी घडतात आणि घडायलाच हव्यात. आपण शाळा, कॉलेजमध्ये अभ्यास करतो आणि विविध परीक्षांना सामोरे जातो. मग वर्गबदल होतो. आयुष्य तसेच आहे, असावे !
झटपट मिळणाऱ्या पैशाचे आकर्षण जवळजवळ सर्वांना असते. हल्ली ‘इन्स्टंट'चा जमाना आहे. सगळं लवकर हवंय कोणामध्येही 'पशन्स' नाहीत. मग पैसाही लवकर हवा असे वाटू लागते. अशा मार्गाने हाताच्या बोटावर लोकांना पैसे मिळतात. बाकी सगळे डोक्याला हात लावून बसतात जे अनितीमान आहे, अनैतिक आहे, त्याचा कालांतराने हासच होणार ! सापशिडीचा खेळ मला फार आवडतो सर्पमुख आणि शिडया. आपण फासे टाकतो. शिडीने क्वचितच वर चढतो पण एक एक घर श्रमाने पुढे जात असताना जागोजागी हे 'तक्षक' असतातच आणि आपण दाणदिशी खाली आपटतो. लहानपणापासून मी ही एक्सायटमेंट अनुभवली आहे.
क्रमश: