लेखांक तेरावा : 'छडी लागे छमछम'

घराचं अंदाजपत्रक बनवताना, हातातोंडाशी आलेला घास जाताना पाहून मला सापशिडीच्या त्या खेळाची सदैव आठवण येते. सरळ मार्गाने जाताना इतके अडथळे, इतर खेळगडी शिडयांच्या सहाय्याने झपाझप वर जात असतात. ते आणखी डिप्रेशन देणारं... अशावेळी एखादा कर्मधर्म संयोगानं सुटला तर आपण हळहळतो. भर गर्दीत आपल्याबरोबरीचा ट्रेनमध्ये चढतो आणि पुढे जातो, आपण किती सुटल्या याची गणितं मांडत बसतो. 

या सर्वांतून सगळेजण जात असतात. आपल्यापेक्षा दुसरा सुखी असं प्रत्येकाला वाटतं. मनुष्यप्रवृत्ती आहे ही ! मध्यंतरी TV वर 'सोच बदलो' असं सांगणारी एक जाहिरात यायची. खरंच self talk बदलला तर किती सकारात्मक बदल घडून येतील. त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वाबर, कुटुंबावर नातेसंबंधावर किती सुंदर परिणाम होईल. 

पूर्वी टीव्हीवर म्हणजे दूरदर्शनवर 'संस्कार' नावाची एक साप्ताहिक मालिका होती. त्याचे श्रीधर फडके यांच्या आवाजातले संस्कारावरचे गाणे आजही मला ताल धरायला लावते. मुंबईतल्या एका 'कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नाही' असे वातावरण असलेल्या शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून मोहन जोशी येतात. 


'छडी लागे छमछम' असा ठाम विश्वास असलेले शिक्षक आणि पौगंडावस्थेतील हट्टी, बेरकी मुलं-मुली, शिक्षकांमध्ये असलेली गटबाजी, थोडक्यात परिस्थिती अगदी हाताबाहेर गेलेली त्या शाळेत 'अच्छे दिन' दिसायला लागतात ते 'मोहन जोशी' यांच्या मुख्याध्यापकाच्या आचार, विचार आणि कृतीतून ... 

शिक्षकांच्या नकारात्मक वृत्तीला ते सकारात्मक बनवतात. मुलांनी वर्गात मस्ती केली की त्या मुलांना ठोकून काढणाऱ्या शिक्षकाला ते एक वाक्य सांगतात - “सर, शिक्षा शरीराला नाही, मनाला व्हायला हवी !” मला वाटते परिवर्तनाची सुरुवात तिथूनच होत असावी. एकदा अंतर्मन सकारात्मक झाले की मनावर आपसूक लगाम घातला जातो. आपण किती संकल्प करतो जानेवारीमध्ये कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवतात आणि नाहीसे होतात. 

परदेशवारीत सार्वजनिक स्वच्छता अनुभवली की आपल्या देशातील गलिच्छपणा, बकालपणा दिसायला लागतो. तिथे सर्वसामान्य नागरीक स्वत:च्या देशाकडे, सार्वजनिक मालमत्तेकडे आदराने पाहतो. तिचे जतन करतो. त्यांना शिकवावे लागत नाही किंवा आपल्या पंतप्रधानांसारखे अनमोल वेळ स्वच्छता मोहिमेत घालवावा लागत नाही. केवळ अयोग्य सवयीमुळे, विचारसरणीमुळे आपण स्वत:बरोबर इतरांच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासात अडसर निर्माण करतो. 

क्रमश: