लेखांक सोळावा ‘मनानं श्रीमंत'
मध्यंतरी पुण्यातला ‘मनानं श्रीमंत' भंगारवाल्याची कथा वर्तमानपत्रात वाचली. दिड किलो सोनं भंगार कपाटात सापडल्यावरही ते मूळ मालकाला परत करण्याचा प्रामाणिकपणा मनाला भावला. पेंडसे आजींचं ते अज्ञात सोनं भंगारवाल्याच्या बकाल आयुष्याचं सोनं करुन गेलं असतं. सद्य:काळात तो तसा वागला असता तर ते काही चूक नव्हतं. पण त्याची ही कृती मात्र २४ कॅरेट सोन्यासारखी होती. ..
लहानपणी आम्हाला 'मिडास' राजाची गोष्ट सांगायचे. मिडास राजा ज्या ज्या वस्तूला स्पर्श करायचा ती सोन्याची व्हायची. त्याला मिळालेले 'वरदान' हेवा वाटण्यासारखं होतं. कनक, कांचन, सुवर्ण किती नावं या धातूला आहेत. अगदी ‘कांचनमृग' पाहून सीतेलाही मोह आवरला नव्हता. सोन्याचं आकर्षण संपूर्ण जगभरात असलं तरी अंमळ आपल्याकडे अधिकच आहे. स्त्रिया अणि सोनं यांचही भावनिक नातं असतं. सोन्याच्या आर्थिक मूल्याबरोबरच आपण भावनिक दृष्टीने अधिक पाहतो. नातेसंबंध निकट करणारा, स्त्रियांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण दुवा आहे. आजीची बोरमाळ, सासूचे पाटल्या-तोडे, मावशीचा चपलाहार, आईच्या बांगडया, नेकलेस . . . अशा कितीतरी प्रकाराने 'त्या' वस्तूंशी असलेली जवळिक सोन्याच्या बाजारभावापेक्षा अधिक होते.
'चकाकते ते सारे सोने नसते' वा 'संकटात स्त्रीमधलं सोनं दिसतं पण पुरुषांचं पितळ उघड पडतं' अशा पूर्वापार वाक्प्रचार, म्हणींतून सोन्याचं ‘उजवं' पण अधोरेखित होतं. आपल्याकडे दागदागिने याद्वारे सोनं वापरलं जातं शिवाय अडीअडचणीच्या काळात हे स्त्रीधन कायम आधार देतं, किंबहुना अशा परिस्थितीत काहीतरी हक्काचं असावं म्हणूनच सोन्याची खरेदी केली जाते. आपल्याकडे किमान काही दागिने सोन्याचे हवेत ही कोणत्याही स्त्रीची सुप्त आंतरिक इच्छा असते. आर्थिक स्तरानुसार स्त्रिया आपल्या वैभवाचं प्रदर्शन करतात. लग्नसमारंभात तर 'सोनं' फार महत्वाचं असतं. किती तोळे दिले आणि घेतले यावरच्या चर्चा कायम रंगतात.
सोन्याचे भाव गगनाला भिडले तरी सोनं खरेदी होत असतंच. हिंदू धर्मात सणवार आदिंची रेलचेल आहेच. साडेतीन मुहुर्त, गुरुपुष्य, लग्न, मुंज, विशेष कार्यक्रम यासाठी सोनं खरेदी केलं जातं. अगदी दसऱ्याला 'आपटयाची पानं' सोनं म्हणून देण्याचा प्रघात आहे. सुवर्णकाळ, सुवर्णयुग, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे, सोन्याचा दिवस अशा शब्दप्रयोगातून त्या त्या गोष्टींचं महत्व व्यक्त होत असतं. कितीही असलं तरी कमी वाटतं ते म्हणजे सोनं ! बाजारभाव वाढला की हळहळायला होतं की तेव्हाच का खरेदी केलं नाही ? थोडया बहुत फरकानं सगळ्यांच्या बाबतीत हे असंच घडतं !
क्रमश