लेखांक पंधरावा : मी काही फार मोठा नाही

मी कुटुंबवत्सल, समाजप्रिय मनुष्य आहे. आत्मिक विकासाकडे माझा आधीपासून कल आहे. सुदैवाने सधन कुटुंबात जन्म झाला तरी समाजव्यवस्थेतील बदल मी डोळसपणे अनुभवलेत. दारिद्रयाची, गरीबीची झळ पोहचली नसली तरी ते जीवन कष्टप्रद कसे असते याची जाणीव मला होती, आहे व राहील ! मला छानशौकीचे, दिखाऊपणाचे, श्रीमंतीचे जात्याच आकर्षण कमी आहे. मला जे विनासायास मिळालंय ते इतरांनाही मिळावं अशी माझी इच्छा असते. आमच्या विको उद्योगसमूहाने व वैयक्तिकरित्या यथाशक्ती देण्याचा मीसुध्दा प्रामाणिक प्रयत्न केलाय, करतो आणि करत राहीन. 


        ८४ लक्ष योनीतून मिळालेला हा 'नरदेह' मला स्वत:च्या विकासाबरोबरच इतरांच्या विकासासाठी वेचायचा आहे. सुदैवाने आध्यात्मिक विचारांचा पगडा व तशी वृत्ती असल्याने माझी गाडी कायम योग्य ट्रॅकवर राहीली कुठे घसरली नाही. 'जे जे भेटे भूत। तया मानिजे भगवंत।।' या वृत्तीने मी समाजाच्या भल्यासाठी कटिबध्द आहे. सद्हेतूने धडपड करणाऱ्या व्यक्तीला मी कधीही मदत करतो. माझा विश्वास संपादन करणाऱ्या व्यक्तीला मी कधीच निराश करत नाही. प्रामाणिक, कामसू, स्पष्ट आचार विचारांची व्यक्ती मला अधिक भावते. स्वार्थी, अप्पलपोटी, मतलबी, हांजीहांजी करणारी, अप्रामाणिक व्यक्ती जशा इतरांना आवडत नाहीत तशा मलाही आवडत नाहीत. माझी 'एनर्जी' मला अशा लोकांवर खर्च करायला आवडत नाही. मनुष्य स्वभावाची पारख मला चटकन होते. मी ही भलेबुरे अनुभव घेतले, पोळलो गेलो, अनुताप झाला, मन:स्ताप पश्चाताप या सर्व पायऱ्यांवरुन जाताना संकुचित, कोत्या वृत्तीच्या व्यक्तींना, त्या अनुभवांना गुरु केले. 

जीवनाच्या शाळेत असे ठकवणारे भेटले की आपण सर्वच शहाणे होतो. आर्थिक बाबतीत तर फार काटेकोर राहावे लागते. माझे चिंतन याबाबतीत नेहमीच चालू असते. माझी 'आपबिती' कधी तरी तुमच्यासमोर मांडेन सध्या तरी तुमची मनोधारणा कशी आहे आणि कोणत्या मनोभूमिकेतून तुम्ही विचार करायला हवा. तुम्हाला चाळ बांधायची आहे की टॉवर उभारायचा हे तुम्ही ठरवलंत की पाया किती खोल व मजबूत हवाय याविषयी तुम्ही दक्षता घेता.. 

तुम्हाला सल्ला द्यायला, मी काही फार मोठा नाही. माझे पाय कायम जमिनीवर राहतील, जरी किती उंच उडालो तरी ! मित्रत्वाच्या नात्याने मी तुम्हाला थोडं थोडं सांगणार आहे, अर्थात बरंचसं तुम्हाला माहित असेलच ! माझे वाचकमित्र तेवढे 'स्मार्ट' नक्कीच आहेत. याचा आपण रिकॅप किंवा पूर्वस्मृतींना उजाळा देणं असं म्हणू शकतो. 

क्रमश: 


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !