लेखांक सतरावा : सोन्याचे भाव कमी जास्त होत असतातच !


आपण 'विकसनशील देश' या प्रकारात मोडतो. सोनं खरेदी अथवा विक्री याचा परिणाम जसा त्या व्यक्ती - कुटुंबावर होतो, तसाच त्या त्या राष्ट्रावरही होत असतो. सोन्याबाबत निरनिराळे मतप्रवाह आहेत, तरीदेखील ‘सोनं' ही प्रतिकूल परिस्थितीत व्यक्तीला तारणारी अनमोल ठेव आहे हे मान्य करायला हवं. 

लेखमालेत सुरुवातीला मी काही प्रश्नावली तयार करायला सांगितली होती. आपल्या स्थावर-जंगम इस्टेटीत आपल्याकडचे सोने किती आहे आणि असायला हवे याचा एक ताळेबंद असायला हवा. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवून आपली मासिक शिल्लक किती राहते ? त्याचा विनियोग आपण कसा करतो हे जसे महत्वाचे आहे तसेच सोने खरेदी बाबत आपले धोरण काय आहे ? शेअर्समध्ये झटपट पैसे मिळतात म्हणून सगळी गुंतवणुक तिथे ओतून उपयोगाचे नाही. नोकरीतून मिळणारा पैसा हा कायम असतो अशा वेळेस तुम्ही सुरुवातीला जबाबदाऱ्या कमी असतात म्हणून वर्षातला एक महिन्याचा पगार अथवा एक तोळा सोनं खरेदी केलंत तर सुरुवातीला मिलिग्रॅमने सुरुवात केलेलं सोनं साठवून कित्येक तोळं होईल. ... सोन्याचे भाव कमी जास्त होत असतातच ! 


सद्य: स्थितीत महागाई बघता सोनं किती स्वस्त होईल हे काही सांगू शकत नाही. पण आहे त्या परिस्थितीत किमान आपल्याकडे काहीतरी हवे म्हणून आपण कणाकणाने जमा करायला हवे, अशी ही गोष्ट आहे. 

अगदी शेवटच्या क्षणाला ही 'गंगाजळी' उपयोगी पडते. म्हणून घरातला अगदी ऑक्सिजन (O2) म्हणून आपण सोन्याचे जतन करावे. अनेकदा बऱ्याच लोकांना वस्तू मोडून नवीन डिझाईन करण्याकडे कल असतो. नाविन्याचे कितीही आकर्षण असले तरी मित्रत्वाच्या सल्ल्याने मी हेच सांगेन वस्तू मोडून नवी बनवू नका. यामध्ये घडणावळ आणि घट आपल्यालाच सोसावी लागते. त्यापेक्षा सोन्याचं ‘वळं' बनवून ठेवा. गरज असेल तेव्हाच पुढचा मागचा विचार करुन दागिना बनवा. फॅशनच्या मागे लागाल तर ही नित्य बदलणारी बाब आहे. ओल्ड फॅशन 'न्यू' रुपात पुन्हा पुन्हा येते. म्हणून आजीचा जुना असणारा 

नेकलेस नातीला तिच्या काळात पुन्हा वापरता येऊ शकतो. 



सोन्याचे रक्षण तळहातावरच्या फोडासारखे करावे हे आपल्याला माहीत नाही असे नाही. तरीसुध्दा सांगावेसे वाटले, कारण आजूबाजूला हरत-हेची माणसं संपर्कात येतात. त्यांच्या वागणुकीमुळे 'बुडती हे जन देखवेना डोळा' अशी अवस्था होते. 

क्रमश: