लेखांक अठरावा : सोन्याची सुरक्षितता ही देखील तितकीच महत्वाची आहे

वर्तमानपत्रातील बातम्या वाचल्या की मनात चलबिचल निर्माण होते . सोन्याचे भाव गगनाला भिडले तसे सोने चोरण्याचे प्रकारही वाढले सर्वसाधारणपणे स्त्रियांना सोन्याचा सोस फार असतो असे गंमतीने म्हणतात शिवाय विविध दागिन्यांच्या स्वरुपात त्या ते वापरतातही. पुरुषांच्या बाबतीत हौसेने दागिने वापरणारे फार थोडे असावेत चेन, अंगठी आणि सणावारी ब्रेसलेट यापुढे पुरुषवर्गात फारसे अलंकार नाहीत. 




पौराणिक कथेत, राजे महाराजे जसे दागिने वापरत तसे आजच्या काळात ते अशक्य आणि तितकेच असुरक्षित ! अगदी लहान मुलांना दागिने घालून 'रिस्क' वाढवू नये इथे प्रत्येकाचेच आयुष्य या ना त्या कारणाने असुरक्षित आहे, तशातच सोने वापरामुळे त्यातील धोका वाढविण्यात काही अर्थ नाही. 

आपल्याकडे काही समाजात स्त्रिया इतके दागिने दैनंदिन वापरतात की कदाचित लग्नकार्य, सणसमारंभात इतर स्त्रिया ते वापरत नसतील ! सोनं ही त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा आणि आर्थिक स्तर दर्शवित असावी अथवा हा मासिकतेचा परिणाम असू शकेल. 

चोरी, दरोडा, खून यांच्या मालिका पाहिल्या तर चोरांनी नियोजनपूर्वक सावधतेने पाळत ठेवून लूट केल्याचे जाणवते. पूर्वी सोनं जमिनीत, भिंतीत, शेतात गाडून ठेवून सुरक्षिततेचा आभास निर्माण केला जायचा. सद्य काळात बॅकेतले लॉकर्स मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. हा एक चांगला पर्याय आहे. केवळ गरजेपुरतं सोनं घरी आणून इतर वेळी ते बँकेत ठेवल्यास त्याच्या सुरक्षिततेची हमी मिळते. 

कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतात, त्यापेक्षा जास्त प्रयत्न ते राखून ठेवण्यासाठी करावे लागतात. घर हे असं क्षेत्र आहे जिथे चौफेर लक्ष ठेवावे लागते. एखाद्या कंपनीत आपण एकाच विभागापुरता जबाबदार असतो. घरी मात्र सगळया बाजू सांभाळाव्या लागतात. दररोज कोणतं ताट वाढलेलं असेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे बरंचसं निस्तरण्यातच आपला वेळ जात असतो. मौल्यवान वस्तूंची खरेदी जितकी निगुतीने केली जाते तितकीच त्याची सुरक्षितता महत्वाची ठरते. धांदरटपणा, वेंधळेपणा, बेफिकिरी आणि कदाचित सहजप्राप्य झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची केवळ Price (किंमत) ठरविली जाते. त्याची Value (मूल्य) ओळखण्यास त्या व्यक्ती कमी पडतात. म्हणून आपण Value पाहतो की Price Tag हे महत्वाचे ठरते. 


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !