लेखांक २० : चांगल्या गोष्टींचे लाभ घ्यायचे बाजूला राहतात
गल्लीबोळात ब्युटीपार्लर्स आढळतात तशीच अवस्था जवळजवळ बॅकांच्याबाबतीत आढळते सरकारने बँकांचा प्रसार देशात सर्वत्र केलेला आहे. व्यक्तीजवळील रोकड ही घरात ठेवणे सुरक्षित नसल्याने ती बँकेत ठेवल्यास त्यावर व्याज मिळते आणि सुरक्षितता हा दुहेरी फायदा होतो. बॅका अशा स्वरुपाच्या रक्कमांवर कर्ज देऊन देशाच्या विकास कार्याला हातभार लावू शकतात. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया ही भारतातील मध्यवर्ती बॅक आहे. रिझर्व्ह बँक काही धोरणं ठरवते आणि त्यानुसार देशातील सर्व बँका त्यांची व्यवहारशैली ठेवतात.
बॅकेशी बहुतांश लोकांचा संबंध येतोच येतो. विहीत नमुन्यातील प्रवेशिका भरल्यास योग्य त्या अटी पूर्ण केल्या की कोणतीही व्यक्ती बॅकेची खातेदार होऊ शकते. प्रत्येक राज्यात 'त्रिसुत्री भाषा' असल्याने बॅकेचे विविध फॉर्मस्, पेपर्स इंग्रजी, हिंदी आणि त्याचबरोबर प्रादेशिक भाषा यांनी युक्त असतात तशी शासनाची सक्ती आहे. त्यामुळे बॅका म्हणजे काहीतरी वेगळं मनात धडकी भरवणारं प्रकरण अशी समजूत अशिक्षित, अल्पशिक्षित व्यक्तींची होऊ शकते. आपल्या डोक्यात उगाचच खुळखुळा वाजत राहतो आणि चांगल्या गोष्टींचे लाभ घ्यायचे बाजूला राहतात आणि आपण दूर पळतो.
समाजातील सर्व स्तरातील लोकांना बॅक व्यवहार समजावेत, यासाठी बॅकेची सर्व यंत्रणा सजग आणि तत्पर असते. लोकांनी त्याचा फायदा घ्यायला हवा. बॅकेचे व्यवहार कसे करतात ? याची सुतराम कल्पना नसणारे अशिक्षित लोक आहेत तसेच काही सुशिक्षित महिलावर्गही आहे कारण चाकोरीबध्द जीवनात त्यांना बाहेर पडावेसे वाटत नाही. किंबहुना, त्यांना अशा व्यवहारांपासून दूर ठेवले जाते किंवा कधी कधी किचकट आर्थिक व्यवहार म्हणजे 'डोक्याला शॉटस्' असेही स्त्रियांना वाटते. माझे सर्वांना असे सांगणे आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणीही नाऊमेद होऊ नये. 'असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे'. आपण प्रयत्न करावेत साधे सोपे व्यवहार करुन पाहावेत. चुका होतील, अडचणी येतील, पण प्रत्येक समस्या, चूक, अडचण तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल. हे केवळ बॅक व्यवहाराबाबतच आहे असे नाही तर आयुष्यात प्रत्येक क्षणी तुम्हाला
हे अनुभव उपयोगी पडतील. तुमचा हा अनुभव तुम्ही इतरांना लाभ करुन देऊ शकता..
शासनाने बँकांचे जाळे सर्वत्र विणले याचे कारण हेच की अगदी खालच्या थरातील व्यक्तीपर्यंत लाभ पोहचावा. येथे दोघांना फायदा होतो. पैशांची सुरक्षितता, त्यावर आकर्षक व्याज आणि पैसे हवे तेव्हा मिळवण्याची हमी याशिवाय या पैशांद्वारे समाजातील इतरेजनांना फायदा होणार असतो.
क्रमश: