लेखांक २१ : बँकांमार्फत देशाच्या अर्थविकासात होते

बँकांमध्ये असणाऱ्या रकमांवर अनेक विधायक कार्ये करण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. शरीरात रक्तवाहिन्यांचे जे कार्य आहे, थोडक्यात तेच कार्य बँकांमार्फत देशाच्या अर्थविकासात होते. या विविध कार्यामुळेच कोणत्याही देशातील बँकेची शाखा ही अतिशय महत्वपूर्ण ठरते. 

आपण सगळेजण 'बँक' हा शब्द वापरतो. त्याची उत्पत्तीही गंमतीशीर आहे. अर्थनीतीमध्ये आपण पैशासंदर्भात 'बँक' ही संकल्पना पाहत असलो तरी जगभर बँक ही संकल्पना व्यापक ठरते, जसे ‘मिल्क बँक', 'स्पर्म बँक' 'बँक' इंग्रजी शब्द Banko 'बँको' या इटालियन शब्दापासून उत्पन्न झालाय. Banko या शब्दाचा अर्थ 'बसण्याचा बाक'. इटलीमध्ये पूर्वी लोंबार्डी शहरात 'ज्यू' लोक रस्त्यावरील बाकांवर बसून पैसे कर्जाऊ देत असत. नाणी / नोटा / चलनांची अदलाबदल करुन देत. आपल्या बँकांमध्येही ही कार्ये होतातच. Banko या शब्दावरुन बँक हा शब्द अस्तित्वात आला. 

व्यवसाय म्हटला की चढ-उतार आलाच ! कारण कोणतेही का असेना मनुष्य संपर्कात अतिविश्वासाने, आतताईपणाने किंवा काही तंत्र न पाळल्यास कुणावरही दिवाळखोरी येऊ शकते. जगभरात प्रत्येकाला हा अनुभव येतच असतो. तद्वतच दिवाळे वाजले या संदर्भात बँकरप्ट Bankrupt हा शब्दप्रयोग रुढ झाला असावा. आपल्या मराठी भाषेत बँक या शब्दाला 'पतपेढी' किंवा 'अधिकोषण' असे प्रतिशब्द आहेत. 

खरंतर बँक हा शब्द इतका रुढ आणि अंगवळणी पडलाय की त्याला प्रतिशब्द 'पतपेढी' फार थोड्यांना माहित आहे आणि 'अधिकोषण' माहित असणारा विरळाच ! कालपरवापर्यंत मलाही माहित नव्हता. 

बँक म्हटल्यावर सर्वसाधारणपणे आपण असे म्हणू शकतो 

"Bank as a person or institute who receives deposits from people and gives back on demand” ( " बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था, जी लोकांच्या ठेवी स्विकारते आणि त्या मागितल्यावर परत करते " ) 

सर्वसामान्य व्यक्ती आणि व्यापारी, मोठे व्यावसायिक अशा सर्वांसाठी बँक ही अत्यंत सुरक्षित गरजेची गोष्ट आहे. 

क्रमश: