लेखांक अकरावा : “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना”
एका हिंदी गाण्याची ओळ मला आठवली “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना” प्रेयसीचा आशावाद छान आहे पण त्यापलीकडे जाऊन मला वाटतं की अशा कल्पनेत स्वप्नरंजनात गुंतुन राहण्यापेक्षा “रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा" हे जास्त समर्पक ठरावे. बदल अपरिहार्य आहे म्हणून सर्व प्रसंगातून जाऊन 'मी' जरा वेगळा ठरेन, मी लवचिक होईन. जीवशास्त्रात 'अमिबा' जसा आकार बदलतो तसं आपण 'मोल्ड' व्हायचं. सरडयासारखं रंग बदलणं मला अपेक्षित नाही . आमच्या विको उद्योगसमूहाला ६५ वर्ष झालीत . आजोबांपासून आम्ही आयुर्वेदिक औषधांचाच पाठपुरावा केला. उत्पादनांची गुणवत्ता तशीच ठेवली. ग्राहकवर्गाच्या गरजांनुसार फेरबदल केले पण निष्ठा, सचोटी सोडली नाही. म्हणूनच आजवरच्या प्रवासात लक्ष्मी सरस्वती' सोबत राहिल्या. घामाचा एक सुगंध असतो. मी १९८६ पासून संचालकपदी आलो पण आमची परिस्थिती 'आगे दुकान पिछे मकान' अशा स्वरुपाची होती. फॅक्टरी पण तिथेच घर पण तिथेच त्यामुळे कष्टाची सवय होती. सर्वच काम करायचे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की 'घामाचा वास' माझ्या नाकात डिओप्रमाणे भरुन राहिला. घरातच इतक...